विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) संदर्भात महत्वाचे प्रसिद्धी पत्रक जारी

Published On: July 29, 2026
Follow Us
Special Intensive Revision

महाराष्ट्रातील मतदारांसाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने महत्त्वाचे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमांतर्गत सध्याच्या मतदार यादीतील मतदारांनी 8 ऑगस्ट 2026 पर्यंत गणना अर्ज (Enumeration Form) भरून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO – Booth Level Officer) यांच्याकडे जमा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार, निर्धारित मुदतीत गणना अर्ज भरून स्वाक्षरीसह जमा करणाऱ्या मतदारांची नावे 17 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत (Draft Electoral Roll) समाविष्ट करण्यात येणार आहे.

प्रारूप मतदार यादीत नाव नसेल तर काय?

17 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत ज्या पात्र मतदारांचे नाव समाविष्ट होणार नाही किंवा जे नव्याने मतदार म्हणून नोंदणीस पात्र असतील, त्यांना 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2026 या कालावधीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करण्याची संधी दिली जाणार आहे.

यासाठी आवश्यक कागदपत्रांसह नमुना क्रमांक 6 (Form 6) भरता येईल. संबंधित मतदार नोंदणी अधिकारी अर्जांची पडताळणी करून पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करतील.

नाव किंवा तपशीलात दुरुस्ती करण्याची सुविधाही उपलब्ध

याच कालावधीत मतदारांना मतदार यादीतील तपशील दुरुस्त करण्याची सुविधाही उपलब्ध राहणार आहे. नाव, पत्ता किंवा इतर माहितीमध्ये सुधारणा करण्यासाठी नमुना क्रमांक 8 (Form 8) भरता येणार आहे.

खोटी माहिती दिल्यास होऊ शकते कायदेशीर कारवाई

मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करताना चुकीची घोषणा किंवा खोटी माहिती दिल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मधील कलम 31 नुसार अशा प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तीला एक वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, असे प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

अंतिम मतदार यादी 19 ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

सर्व अर्जांची पडताळणी आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 19 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी (Final Electoral Roll) प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

अंतिम मतदार यादीनंतरही सुरू राहणार दुरुस्ती प्रक्रिया

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही मतदार नोंदणी आणि दुरुस्तीची प्रक्रिया पूर्णपणे बंद होणार नाही.

लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मधील कलम 22 आणि 23 नुसार पात्र नागरिकांना अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही नाव समाविष्ट करणे किंवा आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी अर्ज करता येईल. ही सतत अद्ययावत प्रक्रिया (Continuous Updation) असून, संबंधित निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंत अशा सुधारणा करता येतील.

मतदारांनी काय करावे?

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सर्व पात्र मतदारांना 8 ऑगस्ट 2026 पूर्वी गणना अर्ज भरून संबंधित BLO कडे जमा करण्याचे आवाहन केले आहे. तसेच 17 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत आपले नाव तपासावे. नाव नसल्यास किंवा माहितीमध्ये त्रुटी असल्यास 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर या कालावधीत अनुक्रमे Form 6 किंवा Form 8 द्वारे अर्ज करून आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी. त्यामुळे अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट होण्यास आणि मतदानाचा अधिकार अबाधित राहण्यास मदत होईल.

Special Intensive Revision

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment