सोशल मीडियावर पनवेलमधील एका लहान मुलीला मारहाण केल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओसोबत “अंगणवाडी सेविकेने मुलीला मारहाण केली” असा दावा करण्यात येत होता. मात्र, महिला व बालविकास विभागाने केलेल्या चौकशीत हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
घटनेची गंभीर दखल घेत महिला व बालविकास विभागाने संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) यांना तातडीने घटनास्थळी पाठवून प्रत्यक्ष चौकशी केली. या चौकशीत व्हिडिओमध्ये दिसणारी महिला अंगणवाडी सेविका नसून संबंधित मुलीची स्वतःची आई असल्याचे समोर आले.
चौकशीनंतर संबंधित महिलेने आपल्या कृत्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच लहान मुलांना मारहाण करणे हा कायद्याने गुन्हा असल्याची जाणीव करून देण्यात आली असून तिचे समुपदेशन सुरू करण्यात आले आहे.
या प्रकरणानंतर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनीही स्पष्टीकरण देत सोशल मीडियावर पसरविण्यात आलेला दावा दिशाभूल करणारा असल्याचे सांगितले. त्यांनी महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका लाखो बालकांच्या संगोपनासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निःस्वार्थपणे कार्य करत असल्याचे नमूद केले. अशा परिस्थितीत कोणतीही खातरजमा न करता अंगणवाडी सेविकांवर खोटे आरोप करणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महिला व बालविकास विभागाने नागरिकांना सोशल मीडियावरील कोणतीही माहिती किंवा व्हिडिओ सत्यता पडताळूनच शेअर करण्याचे आवाहन केले आहे. खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्यामुळे समाजात गैरसमज निर्माण होऊ शकतात, त्यामुळे अफवांपासून दूर राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.







