Anganwadi Sevika May Month Salary महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या मे २०२५ या महिन्याच्या मानधनासाठी २१८ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे राज्यातील हजारो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचाऱ्यांचे मानधन लवकरच अदा केले जाणार आहे.
Anganwadi Sevika May Month Salary
केंद्र निधीच्या विलंबामुळे राज्य शासनाचा पुढाकार
एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे, परंतु केंद्र शासनाकडून निधी मिळण्यास विलंब होत असल्याने अंगणवाडी सेविकांना वेळेवर मानधन मिळत नव्हते. यावर उपाय म्हणून, २०१७ मध्येच अपर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, केंद्रीय सहाय्य प्राप्त नसले तरीही अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची रक्कम खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याच निर्णयानुसार, राज्य शासनाने आता मे महिन्याचे मानधन वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
निधी वितरण तपशील (रुपये लाखात)
- केंद्र हिस्सा ६०% (०२-मजूरी): ४२००.००
- राज्य हिस्सा ४०% (०२-मजूरी): २८००.००
- अतिरिक्त राज्य हिस्सा १००% (०२-मजूरी): १४८००.००
- एकूण: २१८००.०० (रुपये लाखात)
आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांना हा निधी वितरित करण्यात आला असून, त्यांनी हा निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कार्यवाही करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, केंद्र शासनाकडे त्यांच्या हिश्याचा निधी प्राप्त करून घेण्यासाठी पाठपुरावा करण्याचेही सूचित केले आहे.