राज्यातील शाळांमधील अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजन (Shikshak Samayojan 2026) प्रक्रियेबाबत शिक्षण विभागाने तातडीचे निर्देश जारी केले आहेत. सन २०२५-२६ संचमान्यता कामकाजात अनेक शाळांची माहिती अपूर्ण राहिल्यामुळे सुमारे १६०० शाळांची प्रक्रिया प्रलंबित आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना ही प्रक्रिया लवकर पूर्ण करून समायोजनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
संचमान्यतेनुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन त्वरीत पूर्ण करण्याचे निर्देश
सन २०२५-२६ संचमान्यता कामकाज संदर्भात शाळांच्या लॉगिनमध्ये विद्यार्थी संख्या, कार्यरत पदे, माध्यम, अनुदान प्रकार, वर्ग व शाखा यांसारखी आवश्यक माहिती अद्ययावत न केल्यामुळे ही अडचण निर्माण झाली आहे.
याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी तसेच केंद्रप्रमुखांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सन २०२५-२६ संचमान्यतेनुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन त्वरीत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून, यापूर्वी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, ज्या शाळांची संचमान्यता अद्याप पूर्ण झालेली नाही, अशा शाळांसाठी तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे. विद्यार्थी संख्या कमी नसेल तर सन २०२४-२५ संचमान्यतेच्या आधारावर समायोजन प्रक्रिया पूर्ण करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र ही कार्यवाही तातडीने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महत्त्वाचे म्हणजे, संचमान्यता पूर्ण न झाल्यास मंजूर पदांपेक्षा जास्त असलेल्या पदांचे वेतन शालार्थ प्रणालीतून अदा केले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. त्यामुळे संबंधित शाळा व प्रशासनाने ही प्रक्रिया गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज निर्माण झाली आहे.










