DA Hike 2026: सरकारी अधिकारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या महागाई भत्त्याच्या वाढीला अखेर अधिकृत मंजुरी मिळाली आहे.
विशेष म्हणजे हा DA वाढीव दर १ जानेवारी २०२६ पासून लागू करण्यात आला आहे. याबाबतचे सुधारित आदेश सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केले आहेत. यामुळे आता निवृत्तीवेतनधारकांना वाढीव दराने पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जानेवारी २०२६ पासून सुधारित दर (Dearness Relief)
केंद्र शासनाच्या कार्मिक, लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालयाने २४ एप्रिल २०२६ रोजी एका महत्त्वपूर्ण कार्यालयीन ज्ञापनाद्वारे पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली.
या नव्या निर्णयानुसार, केंद्रीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात (Dearness Relief) २ टक्क्यांची घसघशीत वाढ करण्यात आली आहे.
अगोदर हा दर ५८ टक्के होता, तो आता वाढवून ६० टक्के करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ही वाढ १ जानेवारी २०२६ पासून लागू करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या धर्तीवर, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने देखील १८ मे २०२६ रोजी एक महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे.

या परिपत्रकानुसार, महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारक अधिकाऱ्यांनाही ही वाढ लागू करण्यात आली आहे.
म्हणजेच, आता राज्यातील या अधिकाऱ्यांना देखील १ जानेवारी २०२६ पासून ६० टक्के दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील. या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
कोणाला मिळणार या वाढीचा लाभ?
या नव्या आदेशानुसार, महागाई भत्त्यातील (Dearness Relief) या दरवाढीचा फायदा केवळ केंद्रीय नागरी पेन्शनधारकांनाच नाही, तर सशस्त्र दलातील पेन्शनधारक, संरक्षण सेवा अंदाजपत्रकातून पेन्शन मिळवणारे नागरी कर्मचारी, तसेच रेल्वेचे पेन्शनधारक आणि अखिल भारतीय सेवेतील पेन्शनधारक या सर्वांना होणार आहे.
तसेच, बँकांना आणि महालेखापाल कार्यालयांना कोणत्याही पुढील सूचनांची वाट न पाहता त्वरित वाढीव दराने पेन्शनचे वाटप करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
अधिक माहितीसाठी : महागाई भत्ता वाढीचा मूळ शासन निर्णय डाउनलोड करा










