RTE Admission Date Extended: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५% राखीव जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. ३० एप्रिल २०२६ ही पहिल्या निवड यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश निश्चित करण्याची अधिकृत शेवटची तारीख आहे. याबाबत सविस्तर माहिती पाहूया.
RTE Admission 2026-27: प्रवेशासाठी शेवटची संधी
RTE २५% मोफत प्रवेश प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी नियमानुसार, पहिल्या नियमित निवड यादीतील (1st Regular Selection List) विद्यार्थ्यांना कागदपत्रे पडताळणी करुन प्रवेश निश्चित करणेसाठी दि. २०-०४-२०२६ पर्यंत मुदत देण्यात आली होती. सदर मुदत दि. २१-०४-२०२६ ते दि. ३०-०४-२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
सध्याच्या आकडेवारीनुसार, १,०५,८११ विद्यार्थ्यांची निवड झालेली असताना प्रत्यक्षात केवळ ६१४१६ विद्यार्थ्यांनीच आपले प्रवेश निश्चित केले आहेत. पालकांना कागदपत्रांची जुळवाजुळव करताना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत, विशेषतः उत्पन्नाचे दाखले आणि रहिवासी पुराव्यासाठी लागणारा वेळ यामुळे अनेक प्रवेश रखडले आहेत.
हे पाहता, शिक्षण विभागाकडून प्रवेशासाठी मुदतवाढ (Extension) देण्यात आली आहे. याबाबत शिक्षण संचलनालय कार्यालयाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
RTE दुसरी निवड यादी: कधी लागणार आणि प्रक्रिया काय?
सध्या आरटीई पोर्टलवर पहिल्या निवड यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश घेण्याची मुदत २० एप्रिल २०२६ पर्यंत आहे. आता 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ दिल्यामुळे या पहिल्या यादीतील प्रवेश प्रक्रिया पूर्णतः संपल्यानंतरच प्रतीक्षा यादीतील (Waiting List) विद्यार्थ्यांचा विचार केला जातो.
दुसरी यादी जाहीर होण्याबाबतचे महत्त्वाचे मुद्दे
जोपर्यंत पहिल्या यादीतील मुदतवाढीसह सर्व प्रवेश प्रक्रिया संपत नाही, तोपर्यंत दुसरी यादी लावली जात नाही.
पहिल्या यादीतील १,०५,८११ विद्यार्थ्यांपैकी किती जणांनी प्रवेश घेतला आणि किती जागा रिक्त राहिल्या, याचा अहवाल शिक्षण विभाग तयार करतो.
साधारणपणे पहिल्या यादीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ७ ते १० दिवसांच्या अंतराने रिक्त जागांसाठी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू होतात. त्यानुसार आता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्या यादीबाबत हालचाली सुरू होऊ शकतात.
ज्या ८६,०३४ विद्यार्थ्यांची नावे प्रतीक्षा यादीत आहेत, त्यांनी वेळोवेळी आरटीई पोर्टलवरील आपला अर्ज क्रमांक टाकून स्थिती तपासावी. पहिल्या यादीतील पालकांनी प्रवेश न घेतल्यास किंवा कागदपत्रांच्या अभावी प्रवेश रद्द झाल्यास, त्या जागी वेटिंग लिस्टवरील विद्यार्थ्याला संधी दिली जाते.
अद्याप दुसऱ्या यादीबाबतची कोणतीही अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही, त्यामुळे पालकांनी पोर्टलवरील अपडेट्सकडे लक्ष द्यावे.
अधिक माहितीसाठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेच्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.








