सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना‘ ही एक अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे.
या योजनेच्या माध्यमातून आता मुंबई उपनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना बिहारमधील बोधगया या पवित्र तीर्थक्षेत्राचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.
श्रद्धेची जोड आणि शासनाचे पाठबळ असलेल्या या प्रवासासाठी इच्छुकांनी १५ मे २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे. सहाय्यक आयुक्त रविकिरण पाटील यांनी यासंदर्भात अधिकृत आवाहन केले असून, पात्र लाभार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
ही योजना प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या मर्यादित उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील ज्येष्ठ नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून आखण्यात आली आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना आवश्यक पात्रता
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा अधिकृत रहिवासी असणे अनिवार्य असून, त्याचे वय ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांच्या मर्यादेत असणे ही यातील एक महत्त्वाची अट आहे. याशिवाय, लांबच्या प्रवासाचा विचार करता अर्जदार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणेही तितकेच आवश्यक आहे, जेणेकरून प्रवासादरम्यान त्यांना कोणत्याही आरोग्याशी संबंधित अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.
शासनाने या यात्रेदरम्यान ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधेची पूर्ण काळजी घेतली आहे. यामध्ये प्रवास, निवास आणि भोजनाची व्यवस्था शासकीय नियमांनुसार मोफत किंवा सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली जाईल. विशेष म्हणजे, ७५ वर्षांवरील नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि सोयीचा विचार करून त्यांना आपल्यासोबत जीवनसाथी किंवा एका सहाय्यकाला नेण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे वयोवृद्ध नागरिकांना प्रवासात हक्काची साथ मिळेल आणि त्यांचा प्रवास अधिक सुसह्य होईल.
अर्जाची प्रक्रिया पूर्ण करताना नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अर्जात दिलेली माहिती सत्य आणि कागदपत्रांशी सुसंगत असावी, कारण खोटी माहिती आढळल्यास अर्ज तात्काळ रद्द केला जाऊ शकतो. अपूर्ण अर्जांचा विचार केला जाणार नसल्यामुळे, विहित नमुन्यातील अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह वेळेत सादर करणे हिताचे ठरेल.
अधिक सविस्तर माहितीसाठी किंवा अर्जाच्या प्रक्रियेत काही शंका असल्यास मुंबई उपनगर येथील समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधता येईल. श्रद्धेची ही वारी यशस्वी करण्यासाठी पात्र ज्येष्ठ नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करत आपले अर्ज वेळेत सादर करावेत.











