Krishi Sahayak Navin Padnam Decision आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या राज्यातील कृषी सहायकांनी आपले बेमुदत काम बंद आंदोलन तात्पुरते थांबवले आहे. कृषी मंत्र्यांच्या आश्वासनानंतर आणि पदनामात बदल करण्याच्या निर्णयानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. यामुळे आता दि. २८ मे २०२५ पासून कृषी सहायक पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. कृषी सहायकांच्या पदनामात बदल करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Krishi Sahayak Navin Padnam Decision
कृषी मंत्र्यांशी चर्चेनंतर निर्णय
कृषी सहायक संघटनांच्या प्रतिनिधींनी कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांची भेट घेतली. यावेळी कृषी मंत्र्यांनी कृषी सहायकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे सांगितले. खरीप हंगाम तोंडावर असल्याने आणि शेतकऱ्यांना मदतीची गरज असल्याने, कृषी सहायकांनी आंदोलन करणे योग्य नाही, असे आवाहन कृषी मंत्र्यांनी केले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी सहायकांच्या अडचणींवर सविस्तर चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.
पदनामात महत्त्वाचा बदल
या बैठकीत कृषी सहायकांच्या एका महत्त्वाच्या मागणीला सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. आता कृषी सहायकांच्या पदनामात बदल करून ते ‘सहायक कृषी अधिकारी’ असे करण्यात आले आहे. तसेच, कृषी पर्यवेक्षकांचे पदनाम ‘उप कृषी अधिकारी’ असे केले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विविध संघटनांच्या मागणीनंतर हा बदल करण्यात आला आहे. मात्र, हा बदल केवळ पदनामापुरता मर्यादित असून वेतनश्रेणी, वेतनस्तर किंवा सेवाप्रवेश नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
संघटनेकडून शासनाचे आभार
महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेचे अध्यक्ष विलास रिढे आणि सरचिटणीस महेंद्र गजभिये यांनी शासनाने त्यांच्या मागण्यांची दखल घेतल्याबद्दल आणि कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांचे आभार मानले. शासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत संप स्थगित करत असल्याचे त्यांनी जाहीर केले. यामुळे शेतकऱ्यांना आता पुन्हा कृषी सहायकांची मदत मिळणार आहे.
शासनाने कृषी सहायकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक पावले उचलल्यामुळे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आता कृषी सहायक आपले नियमित काम पुन्हा सुरू केले आहे. शासन व कर्मचाऱ्यांमध्ये संवादाच्या माध्यमातून निर्माण झालेला समन्वय निश्चितच स्वागतार्ह आहे.