Heat Wave Alert: उष्णतेच्या तीव्र लाटेचा या दोन जिल्ह्यात हवामान विभागाचा येलो अलर्ट

Published On: May 15, 2026
Follow Us
Heat Wave Alert Nagpur

Heat Wave Alert: सध्या तापमानात मोठी वाढ होत असून, उन्हाचे चटके दिवसेंदिवस असह्य होऊ लागले आहेत. या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.

या दोन्ही जिल्ह्यांना दि १६ ते १८ मे दरम्यान येलो अलर्ट देण्यात आला असून, नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. उन्हाचा वाढता जोर पाहता विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी नुकतीच एक विशेष बैठक घेऊन विद्यार्थी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

अपेक्षित परिणाम आणि सुचवलेल्या उपाययोजना (Heat Wave / Severe Heat Wave)

Heat Wave Yellow Alert Red Alert Orange Alert

येलो अलर्ट (Yellow Alert) क्षेत्र: या भागात तापमान मध्यम असते. हे तापमान सर्वसामान्य लोकांसाठी सहन करण्याजोगे असले तरी, लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींसाठी मात्र थोडे त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे शक्यतो थेट उन्हात जाणे टाळा. बाहेर जाताना सुती, फिक्या रंगाचे आणि सैल कपडे वापरा. घराबाहेर पडताना डोक्यावर रुमाल, टोपी किंवा छत्रीचा वापर नक्की करा.

ऑरेंज अलर्ट (Orange Alert) क्षेत्र: या भागात तापमान जास्त असते. त्यामुळे जे लोक जास्त वेळ उन्हात असतात किंवा कष्टाची कामे करतात, त्यांना उष्णतेचा आजार होण्याची दाट शक्यता असते. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि जुनाट आजार असलेल्यांनी खूप काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हाच्या तीव्र झळांपासून (Heat Wave) स्वतःचा बचाव करा आणि शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ देऊ नका. तहान लागलेली नसली तरीही थोड्या-थोड्या वेळाने भरपूर पाणी प्या. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी ओआरएस (ORS), लस्सी, ताक, लिंबूपाणी किंवा पेज यांसारख्या घरगुती पेयांचा जास्तीत जास्त वापर करा.

रेड अलर्ट (Red Alert) क्षेत्र: येथे उष्णतेची पातळी अत्यंत धोकादायक असते. या भागात कोणत्याही वयाच्या व्यक्तीला उष्माघात (Heat Wave) किंवा उष्णतेचा अतिगंभीर त्रास होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे आणि घरातील लहान मुले, आजारी व्यक्ती व वृद्धांची जास्तीत जास्त काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

दुपारी ११ ते ४.३० दरम्यान सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी

वाढत्या उन्हाचा सर्वाधिक फटका विद्यार्थी आणि कामगारांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा मुख्य उपाय म्हणून सकाळी ११ ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये, असे सक्त निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

याशिवाय सर्व शाळा, महाविद्यालये, खाजगी आस्थापना आणि कोचिंग सेंटर्स यांनी विद्यार्थ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य ती खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. दुपारच्या वेळेत उष्माघाताचा धोका सर्वाधिक असल्याने प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

आरोग्य व्यवस्था आणि प्रशासनाची पूर्वतयारी

उष्माघाताचे रुग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क करण्यात आले आहे.

उष्माघाताच्या रुग्णांवर त्वरित उपचार व्हावेत यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये (PHC) विशेष ‘कोल्ड वॉर्ड’ तयार करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

तसेच, उष्णतेवरील उपचारांसाठी लागणाऱ्या आवश्यक औषधांचा पुरेसा साठाही उपलब्ध करून ठेवण्यात आला आहे.

नागपूर आणि चंद्रपूर सारख्या महानगरपालिका क्षेत्रांमध्येही नागरिकांना उन्हापासून दिलासा देण्यासाठी विविध पावले उचलण्यात आली आहेत. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी माहिती दिली आहे की, नागरिकांच्या सोयीसाठी शहरातील प्रमुख चौकांमध्ये ग्रीन नेट लावण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त महानगरपालिका हद्दीत ‘सेंटर होम’ सारख्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

मे आणि जून या दोन्ही महिन्यांमध्ये संपूर्ण विभागात हा Heat Wave Alert लागू राहणार आहे. त्यामुळे उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये, याबद्दल प्रशासनाकडून सर्वसामान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे.

नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्ट केले आहे की, उष्णतेच्या लाटेसंदर्भातील या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना १६ जूनपर्यंत लागू राहतील. प्रशासनाने सर्व प्रकारची तयारी पूर्ण केली असली तरी, नागरिकांनीही गरजेशिवाय भर दुपारी घराबाहेर पडणे टाळावे आणि प्रशासनाच्या या Heat Wave Alert ला अत्यंत गांभीर्याने घेऊन स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

अधिक माहितीसाठी : https://mausam.imd.gov.in/responsive/heatwave_guidance.php

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment