भारतीय हवामान विभागाने ५ जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या हवामान अंदाजानुसार, ५ ते ७ जुलै २०२६ या कालावधीत मुंबई तसेच रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, तर तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सोमवार, दि. ६ जुलै २०२६ रोजी मुसळधार पाऊस व सोसाट्याचे वारे वाहणार असून पावसाचा ऑरेंजअलर्ट देण्यात आला आहे.
तसेच भारतीय हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई आणि रायगड जिल्हातील शासकीय, खासगी आणि महानगरपालिका शाळा, महाविद्यालयांना उद्या सोमवार, दिनांक ६ जुलै २०२६ रोजी सुटी जाहीर करण्यात येत आहे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहनदेखील बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
तसेच भारतीय हवामान विभागाने दिनांक ५/७/२०२६ रोजी दिलेल्या पूर्वसूचनेनुसार ठाणे जिल्ह्यामध्ये दिनांक ६/७/२०२६ रोजी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा (Heavy to very heavy rainfall at a few places with extremely heavy rainfall at isolated places) इशारा दिलेला असून दिनांक ६ जुलै २०२६ रोजी ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्यानुषंगाने सुट्टीचा आदेश जारी करण्यात आला आहे,

रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन ना. जावळे यांनी सोमवार, दि. ६ जुलै २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी तसेच सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

दरम्यान रायगड जिल्ह्यात १ जुलैपासून सातत्याने पाऊस सुरू असून संभाव्य अतिवृष्टीचा धोका लक्षात घेऊन सर्व तहसीलदार तथा इन्सिडंट कमांडर यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेत ६ जुलै रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याची शिफारस जिल्हा प्रशासनाकडे केली होती. या अहवालांचा विचार करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या २ ऑगस्ट २०१९ च्या परिपत्रकानुसार प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचना आणि स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
तथापि, विद्यार्थ्यांना सुट्टी असली तरी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कामकाज करावे, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, अतिवृष्टीच्या काळात नदी, नाले, धबधबे आणि पूरप्रवण भागांपासून दूर राहण्यास तसेच अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.









