शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शिक्षक किंवा शिक्षण सेवक पदावर थेट नियुक्ती देण्याची तरतूद रद्द केली आहे. या संदर्भातील शासन निर्णय दिनांक 25 मार्च 2026 रोजी जारी करण्यात आला आहे.
पूर्वी शासनाच्या 10 जून 2005 च्या पूरकपत्रानुसार, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आवश्यक शैक्षणिक पात्रता मिळविल्यास त्यांना कोणतीही स्पर्धा परीक्षा न देता शिक्षक किंवा शिक्षण सेवक पदावर नियुक्ती देण्याची तरतूद होती. मात्र, या प्रक्रियेमुळे गुणवत्ताधारक उमेदवारांना अन्याय होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले होते.
सन 2017 पासून पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती ही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे करण्यात येत आहे. यामुळे गुणवत्तेच्या आधारावर शिक्षकांची निवड सुनिश्चित होत आहे. अशा परिस्थितीत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना स्पर्धेविना नियुक्ती देणे हे शैक्षणिक गुणवत्तेला बाधा आणणारे असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर 2005 मधील संबंधित तरतूद पूर्णतः रद्द करण्यात आली असून, शिक्षकेत्तर पदावरून शिक्षक पदावर नियुक्तीबाबत इतर कोणत्याही आदेशातील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष तरतुदीही तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आल्या आहेत.
या निर्णयामुळे पुढील काळात शिक्षक भरती पूर्णपणे गुणवत्ता व स्पर्धा परीक्षांच्या आधारेच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अधिक माहितीसाठी : शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शिक्षक पदावर थेट नियुक्ती रद्द शासन निर्णय डाउनलोड करा









